ब्रेकिंग न्यूज

मांजरसुंब्यात भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्यासह एक म्हैस ठार

महामार्ग पोलिसांमुळेच अपघात घडल्याचा आरोप

नेकनूर (तुळजीराम शिंदे) | सोलापूर कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैया च्या समोर धडक दिल्याने त्यामध्ये एक शेतकरी व एक म्हैस जागीच ठार झाले. तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मांजरसुंबा येथील महामार्ग पोलिसांमुळेच झाल्याचा आरोप करत तेथील ग्रामस्थांनी धुळे- सोलापुर हायवे जवळपास एक तास भर बंद करून महामार्ग पोलिसांवरच गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यामध्ये नेकनूर पोलिस स्टेशनचे पी एस आय विलास जाधव यांनी मध्यस्थी करून रस्ता मोकळा करून दिला.

अधिक माहिती अशी की, काल दिनांक 21 रोजी सोलापूर कडून औरंगाबाद कडे निघालेला ट्रक क्रमांक आर जे 40 जी 39 46 हा उदंड वडगाव येथून पुढे जात असताना उदंड वडगाव व मांजरसुंबा च्या दरम्यान मांजरसुंबा येथील महामार्ग पोलीस गाड्या आडवत असल्याची माहिती या गाडीच्या चालकाला मिळाल्याने या पोलिसांना गुंगारा देऊन पुढे जाण्याच्या नादात गाडीचा वेग वाढवला.

 

यामध्येच त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोर रस्त्यावरून जात असलेला शेतकरी आणि त्याच्या तीन म्हशी न दिसल्याने या ट्रकने त्या शेतकऱ्याला व म्हशींना चिरडल्याने त्या शेतकरी व एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याचे नाव भानुदास वाघिरे असे असून ते शिवाजीनगर( उदंड वडगाव) तालुका बीड येथील रहिवासी असून या घटनेची माहिती गावातील लोकांना झाल्यावर त्यांनी धुळे सोलापूर रोडवर रस्ता रोको करून हा अपघात मांजरसुंबा महामार्ग पोलिसांमुळेच झाला असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करत रस्ता रोको केल्याने रस्त्यावर दोन्ही बाजूला जवळपास एक ते दोन किलोमीटरच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. ही माहिती नेकनूर पोलिसांना कळाल्यानंतर नेकनूर पोलीस स्टेशनचे पी एस आय विलास जाधव, पोलीस कर्मचारी ढाकणे, राठोड, वाघमारे, राऊत, अमोल नवले, घुले, चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील नागरिकांची मध्यस्थी करून रस्ता मोकळा करून दिला. तरी या ट्रकचा चालक फरार असून त्याच्या विरोधात नेकनूर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महामार्ग पोलीस मदतीसाठी की वाटमारी साठी?
मांजरसुंबा येथील महामार्ग पोलीस अक्षरशा सकाळी सहा वाजल्यापासूनच गाड्या अडवत असतात व त्यांच्या कडून कोणत्याही कारणाने हप्ता वसुली करत असतात असे अनेक वेळा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. म्हणूनच अनेक वेळा तेथून जाणाऱ्या गाड्या पोलिसांना चुकवण्यासाठी सुसाट वेगाने निघून जात असल्याने अपघात घडत आहेत. म्हणून महामार्ग पोलीस हे मदतीसाठी आहेत की वाट मारी साठी आहेत असाच प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button