राजकीय

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या-रमेश पोकळे

मावळत्या आमदारांनी बारा वर्षात काय दिवा लावला? पोकळेंचा सवाल

पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या-रमेश पोकळे
मावळत्या आमदारांनी बारा वर्षात काय दिवा लावला? पोकळेंचा सवाल
नांदेड दि 24.( प्रतिनिधी) मराठवाड्यातील बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत ते सोडवण्यासाठी पदवीधरांनी मला संधी द्यावी असे आवाहन करून राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांना आमदारकी केवळ उद्योगाच्या संरक्षणासाठी हवी आहे. मावळत्या आमदारांनी बारा वर्षात काय दिवा लावला? असा खडा सवाल पत्रकार परिषदेत मराठवाडा शिक्षक संघ व संभाजी सेना महाराष्ट्र चे पूरस्कृत अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रचारानिमित्त आज नांदेडमध्ये उमेदवार रमेश पोकळे पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की, सरकारच्या दिशाहीन धोरणामुळे दिवसेंदिवस पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत ते सोडवण्यासाठी मला संधी द्यावी. मावळत्या आमदारांनी मराठवाड्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विधीमंडळात न बोलता शैक्षणीक संस्थांना राजकीय अड्डा बनवण्याचे काम केले. बारा वर्षात पदवीधर आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर काय दिवा लावला? हे जाहीर करावे असे आव्हान दिले. यावेळी रमेश पोकळे म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला शिक्षण क्षेत्राची माहिती नाही. पक्षाचे दोन्ही उमेदवार घोटाळा खोर आहेत त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. मी भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सहवासात वाढलेला सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाकडे माझे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन मी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यात कोणते निकष लावले हे मात्र कळत नाही. माझी उमेदवारी मी पदवीधरांच्या आग्रहास्तव आणि मतदारांच्या पाठबळावर निश्चित केली आहे. संपूर्ण मराठवाड्यात आपल्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून,विविध राजकीय पक्षातील असमाधानी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याचा हात पुढे येत आहे. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे. माझ्या उमेदवारीला माझे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन मराठवाडा शिक्षक संघाने आणि संभाजी सेना महाराष्ट्र यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे, मी या निवडणुकीत निश्चितपणे विजय होणार असल्याचा विश्वासही उमेदवार रमेश पोकळे यांनी व्यक्त केला. आपली उमेदवारी येऊ नये यासाठी काही झारीतील शुक्राचार्यांनी पुण्याई खर्च केली ती केवळ भीतीपोटी असा आरोपही रमेश पोकळे यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला मराठवाडा शिक्षक संघाचे  केंद्रीय कार्यकारणी सदस्य राजकुमार कदम, नांदेड जिल्हाध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, जिल्हा सचिव राजेंद्र वाकोडे, शहराध्यक्ष उत्तमराव लाटकर यांच्यासह शिक्षक संघटनेचे अनेक पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button