बीड

नगर रोडच्या कामाची अँड. अजित देशमुख यांचेकडून अभियंत्यांसह पाहणी

नगर रोडच्या कामाची अँड. अजित देशमुख यांचेकडून अभियंत्यांसह पाहणी

बीड ( प्रतिनिधी ) जरुड – वडवणी – तेलगाव – शिरसाळा या नॅशनल हायवेच्या कामानंतर आता नगर रोडला शिरापुर धुमाळ ते सौताडा या चाळीस किलोमीटर अंतरातील रस्त्याचे काम चालू झाले आहे. या कामाची पाहणी काल जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली. यावेळी अभियंत्यांसह कंत्राटदार देखील उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील दिल्या.

शिरापुर धुमाळ ते सौताडा हा चाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता सात मीटर रुंद होणार आहे. या रस्त्यावर पन्नास एम. एम. आणि तीस एम. एम. असे दोन थर टाकण्यात येणार आहेत. बऱ्याच ठिकाणी झालेल्या कामाची पाहणी करून किती जाडीचा थर टाकण्यात येत आहे, याची तपासणी देशमुख, अभियंते आणि कंत्राटदार यांनी संयुक्तपणे केली. या कामावर देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. मात्र संपूर्ण काम दर्जेदार व्हावे, यासाठी अभियंते, कंत्राटदार या सर्वांनी लक्ष ठेवावं, असेही देशमुख यांनी यावेळी म्हटले.

नायगाव येथील काही अतिक्रमण नॅशनल हायवेच्या अभियंत्यांनी यांनी काढले आहे. या रस्त्यावर असणाऱ्या प्रत्येक गावातील अतिक्रमण धारकांनी नॅशनल हायवेवर असलेले आपले अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावे. प्रशासनावर अतिक्रमण काढण्याची वेळ आणू नये, असे आवाहन देशमुख यांनी अतिक्रमण धारकांना केले आहे.

अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्याचे काम झाल्यानंतर आपल्या पाईप लाईन साठी खड्डे खोदतात. शेतकऱ्यांना विशेष करून पाईपलाईन करू द्यायला हरकत नाही. परंतु डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जर खड्डे खोदले जात असतील तर हा फौजदारी गुन्हा आहे. अशा शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. यासाठी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दोषी शेतकऱ्यांवर कारवाई करावी. मात्र काम होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पाईपलाईन टाकायची असेल तर त्यांनी ती रीतसर टाकावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

दर्जेदार काम व्हावे, हा पाहणी मागचा उद्देश असून अनेक ठिकाणच्या तपासणीनंतर गुणवत्तेप्रमाणे काम होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र ही गुणवत्ता शेवटपर्यंत कायम रहावी यासाठी आपण पुन्हा अचानक तपासणी करू. कमतरता वाटल्यास आपण जिल्हाधिकारी यांना याबाबत अवगत करू, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button