बीडबीड जिल्हा

कापूस खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 19 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

बीड,  जिल्हायातील कापूस खरेदी हंगाम 2020-21 मधील कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे सूचनेप्रमाणे व एनआयसी, बीड यांचे सहकार्याने जिल्हयातील शेतकऱ्यांचे कापसाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी गुगल लिंक बाजार समित्यांना देण्यात आलेली आहे. सदर गुगल लिंकवर शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री योग्य कापसाची नोंदणी करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती व त्यानुसार बाजार समित्यांकडे कापूस नोंदणीसाठी कागदपत्रे जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी करण्याचे काम बाजार समित्यांचे स्तरावर सुरु आहे. परंतू जिल्हयातील बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हयातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद करण्याची मुदत दि. 19 डिसेंबर 2020 अखेर वाढविण्यात येत आहे. जिल्हयातील ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या वाढीव कालावधीत त्यांचेकडील विक्री योग्य कापसाची आपल्या तालुक्याचे बाजार समितीमध्ये आवश्यक त्या कागदपत्रासह नोंद करावी. यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
तसेच शेतकऱ्यांचे नावावर व्यापारी कापूस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व सीसीआयच्या वतीने जिल्हयात कापूस खरेदी केंद्र चालू करण्यात आलेली आहेत. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी प्रथम शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात त्यांचे कापूस उत्पादन क्षेत्र आहे. अशा बाजार समितीकडे खरीप हंगाम 2020-21 मधील कापूस पेऱ्याची नोंद असलेला सातबारा, तलाठी यांचे स्वाक्षरी व शिक्यासह कापूस पीक पेरा प्रमाणपत्र, जनधन बँक खात्याव्यतिरिक्त आधार लिंक असलेल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांनी कापूस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास कापसाची रक्कम खरेदी केंद्राद्वारे अदा केली जाणार नाही, त्याप्रमाणे संबंधाविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*-*-*

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button