बीड जिल्हामाजलगाव

यंदा देवदहिफळची खंडोबा यात्रा होणार नाही..!

● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा निर्णय

दिंद्रुड दि.15 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेली देवदहिफळची खंडोबा यात्रा यावर्षी होणार नाही. तरी भाविकांनी यंदा यात्रेसाठी येऊ नये असे आवाहन सरपंच श्रीधर बडे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बडे यांनी सांगितले.

याबाबत अधिक वृत्त असे की, धारुर तालुक्यातील देवदहिफळ येथे दरवर्षी मल्हारी म्हाळसाकांत खंडेरायाची मोठी यात्रा भरते. तब्बल दीड ते दोन महिने चालणाऱ्या यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तर लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातुन दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. परंतु जगभर कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून अद्याप या विषाणूजन्य आजाराचा धोका टळलेला नाही. गर्दीतून संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
शनिवार दि. 19 रोजी नागदिवे पूजनानंतर सुरु होणाऱ्या या यात्रेत पालखी सोहळा व शोभेची दारु उडवण्यात येते तर खंडोबा व म्हाळसादेवीच्या विवाहाचा मनमोहक सोहळा चंपाषष्ठीच्या पहाटे साजरा होतो. गाड्या ओढणे, कुस्त्यांची दंगल हे यात्रेतील प्रमुख आकर्षण असतात. मात्र यात्रेत गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.
यात्रेतील मनोरंजन करणारे सिनेमा थेटर, तमाशे, खेळणीची दुकाने, कपडे, भांडे सोन्याचांदीचे व्यापारी यांना यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी व भाविकांनी येऊ नये असे थेट आवाहन करण्यात आले आहे. साहजिकच यात्रा महोत्सव रद्द झाल्यामुळे भाविक भक्तांच्या उत्साहावर विरजण पडत असले तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी देवदहिफळकरांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button