गेवराईबीड जिल्हा

वर्षानुवर्षे नगर परिषदेची सत्ता भोगणा-या पवारांना निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्यांक समाजाचा कळवळा का ?

माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा व सय्यद एजाज यांचा सवाल

गेवराई, दि. (प्रतिनिधी) ः- निवडणुक आली की अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाची आठवण येते, सत्ता भोगताना मात्र समाजाचा विसर पडतो. आश्‍वासन देवूनही पाच वर्षांत मुस्लिम समाजाला उपनगराध्यक्ष पद दिले नाही. आजवर समाजाने पक्ष न पाहता तुम्हाला सतत साथ दिली मात्र समाज अडचणीत असताना शाहीनबाग सारख्या आंदोलनाला भेट देण्याचे औदार्य सुध्दा तुम्ही दाखविले नाही. आजही शहरातील मुस्लिम बहुलभाग मुलभूत सुविधांपासून दुर्लक्षित आहे. असे असतानाही निवडणुकीच्या तोंडावर आ.लक्ष्मण पवार आणि बाळराजे पवार दोघे बंधु समाज बांधवांच्या दारोदारी फिरत आहेत. वर्षानुवर्षे नगर परिषदेची सत्ता भोगणार्या पवार बंधुंना निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा कळवळा का ? असा सवाल माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई व माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी उपस्थित केला आहे.

 

गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि त्यांचे बंधु बाळराजे पवार हे सध्या गेवराई शहरातील प्रतिष्ठीत मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील प्रमुखांच्या घरी भेटी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाच्या पदाधिकार्यांच्या घरी सुध्दा भेटी देवून या भेटीचे फोटो जाणीवपूर्वक व्हायरल करून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या पदाधिकार्यांबद्दल राजकीय गैरसमज पसरविण्याचे काम पवार बंधु करत असल्याची टिका करून माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई व नगरसेवक सय्यद एजाज यांनी त्यांच्यावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे टिका केली. पत्रकात पुढे म्हटले आहे की, अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून सत्तेची संधी मिळताच त्यांना दूर सारण्याचे पाप पवारांनी केले. शहरात मुस्लिम बहुल भागात आजही नागरी सुविधा नाहीत, कुरबू मोहल्ला, तय्यबनगर, मोमीनपुरा, खडकपुरा, राजगल्ली, संजयनगर या भागात रस्त्यांची दुरावस्था आहे, घाणीचे प्रचंड साम्राज्य आहे. मात्र या भागाच्या विकासासाठी आ.लक्ष्मण पवार यांना वेळ मिळत नाही. त्यांना केवळ कोल्हेर रोड भागाचा विकास करून त्या भागातील प्लॉटींगचे दर वाढवायचे असल्याचीही टिका त्यांनी केली.

 

मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर भाजपाकडून सातत्याने अन्याय केला जातो. समाज अडचणीत असताना समाजाच्या मतांवर सत्ता भोगणार्या आ.लक्ष्मण पवार यांनी जाणीवपूर्वक शाहीनबाग सारख्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. भाजपाचे आमदार म्हणून नव्हे तर गेवराईचे पाटील म्हणून तरी त्यांनी या आंदोलनाला भेट देतील अशी अपेक्षा समाजाला होती, मात्र मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा त्यांनी अपेक्षा भंग केला आहे. आता निवडणुका जवळ येत असल्याने त्यांना याची जाणीव होवू लागली आहे, त्यामुळेच केवळ निवडणुकीपुरता वापर करणार्या पवार बंधुंना समाजाच्या व्यक्तिंच्या दारोदारी जावून उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे अशी खरमरीत टिका माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई व माजी नगरसेवक सय्यद एजाज यांनी केली आहे. यावेळी समाजातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button