गेवराईबीड जिल्हाराजकीय

गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अमरसिंह पंडित समर्थकांचा मोठा विजय

मादळमोही, गढी व तलवाडा या मोठ्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

 

गेवराई ः- तालुक्यातील २२ पैकी १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकहाती सत्ता मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. माजी आ.अमरसिंह पंडित समर्थकांना मोठा विजय मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मादळमोही, तलवाडा व गढी या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली, या तिन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकहाती सत्ता मिळविली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व असल्याचे सिध्द झाले. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई निवासस्थानी कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.

गेवराई तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवार, दि.१८ जानेवारी रोजी जाहिर करण्यात आले. अत्यंत प्रतिष्ठेच्या मादळमोही ग्रामपंचायतीचा पहिला निकाल जाहिर झाला, मादळमोहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजयी सलामी मिळाली. मादळमोही, भडंगवाडी, जव्हारवाडी, कुंभारवाडी, गढी, डोईफोडवाडी, चव्हाणवाडी, गोविंदवाडी, तलवाडा, गंगावाडी, सुर्डी, चोपड्याचीवाडी आणि खेर्डावाडी या १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळाले. तालुक्यात १८६ जागांवर निवडणुक संपन्न झाली, यामध्ये ८ जागा रिक्त असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला १२१ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांना मिळालेल्या मोठ्या विजयाचा जल्लोष त्यांनी गेवराई येथील कृष्णाई निवासस्थानी साजरा केला. ढोलताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी विजयी उमेदवारांची अभिनंदन करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. गेवराई विधानसभा मतदार संघातील बीड तालुक्यातील गुंदा, बहिरवाडी व आनंदवाडी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व सिध्द केले असून विजयसिंह पंडित समर्थकांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

मादळमोही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ.कमलताई बप्पासाहेब तळेकर यांचा वार्ड क्र.४ मध्ये सौ.ज्योती विकास तळेकर यांनी पराभव केला. मादळमोही ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द भाजप-सेना अशी लढत झाली तर तलवाडा ग्रामपंचायतीमध्ये अ‍ॅड.सुरेश हात्ते यांच्या पॅनलचा दारुन पराभव झाला. मागील २५ वर्षांची त्यांची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उखडून टाकली. माजी आ.अमरसिंह पंडित यांची कर्मभुमी म्हणून ओळख असलेल्या गढीमध्ये ११ पैकी ११ जागा जिंकत पंडितांनी गढी राखली. अनेक ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि विद्यमान भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांना पॅनल उभा करता आला नाही. ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पकड असल्याचे या निवडणुक निकालानंतर सिध्द झाले.

माजी आ.अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत कष्ट घेणार्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. पराभुत उमेदवारांची व पॅनल प्रमुखांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button