बीड जिल्हा

भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यांनी नैतिकता बाळगावी – अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) भ्रष्टाचार विरोधी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची सध्या समाजाला गरज आहे. प्रत्येक गावात एक अथवा अनेक कार्यकर्ते या कामात लागले तर गावाचा विकास होण्यास मदत होईल. इतकेच नाही तर ही चळवळ फोफावली पाहिजे. या चळवळींमध्ये तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. भ्रष्टाचाराला विरोध करताना तो नैतिकता बाळगूनच केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

सन २०२० या एका वर्षात ज्या ज्या फिर्यादीने अँटी करप्शनच्या केसेस केलेल्या आहेत आणि लाच घेणाऱ्यांना पकडून दिले आहे, अशा फिर्यादिंचा सत्कार २६ जानेवारी २०२१ रोजी बीड येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अँड. देशमुख बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जन आंदोलनाचे सचिव अशोक सब्बन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नवनाथ नाईकवाडे यांनी केली होते.

अँड. देशमुख पुढे म्हणाले की, अँटी करप्शनच्या केसेस करणाऱ्या प्रत्येक फिर्यादीला त्रास झालेला असतो. किरकोळ आणि कायद्याप्रमाणे असलेले काम न झाल्यामुळे त्याला मानसिक वेदना होतात. त्यातूनच त्याला लाचखोराला गुंतवण्यासाठी पुढे यावे लागते. इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस होत असतानाही अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्टाचार करणे थांबवत नाहीत, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

यावेळी अशोक सब्बन यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भ्रष्टाचार विरोधी चळवळीसाठी कार्यकर्त्यांनी काम करायला हवे. तरच भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. तर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती अभियानाचे अध्यक्ष नवनाथ नाईकवाडे यांनी फिर्यादीच्या सत्कारा बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून २६ जानेवारीला घेण्यात येतो. यातून फिर्यादी यांना प्रोत्साहन दिले जाते, असेही ते म्हणाले.

अनेक फिर्यादिंनी केलेल्या केसेस संदर्भात आपले मत व्यक्त केले. ज्यावेळेस कायदेशीर मार्गाने सरळ काम होत नाही, त्यावेळेस किती यातना सहन कराव्या लागतात, हे अनेक फिर्यादीने उकलून सांगितले. फिर्यादी कधीही जाणीव पूर्वक कोणाला अडकवण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र हतबल होऊन त्याला हे पाऊल उचलले लागते, असेच मत जवळपास सर्व फिर्यादिंचे होते.

यावेळी बलभीम बजगुडे, गोवर्धन मस्के, डॉ. भगीरथ बांड, शेख यासीन पाशा, राजाभाऊ पंडित, किसनराव सावंत, भास्कर पाटील, कैलास राऊत, यांचेसह या वर्षातील सर्व फिर्यादी आणि त्यांचे मित्र मंडळ हजर होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button