गेवराईबीड जिल्हा

गोरगरीब निराधारांची आर्थिक लूट करणाऱ्यांची गय करणार नाही

विजयसिंह पंडित यांचा इशारा

गेवराई – संजय गांधी निराधार योजनेसह इतर निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, योग्य लाभार्थ्यांना तात्काळ वेतन अनुदान मंजूर झाले पाहिजे यासह विविध विषयांच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.विजयसिंह पंडित, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष श्री.राधेशाम येवले यांनी तहसीलदार श्री.सचिन खाडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तहसील कार्यालयामध्ये याबाबत विजयसिंह पंडित यांनी नुकतीच भेट घेऊन चर्चा केली.

संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अनुदान मंजुरीच्या प्रकरणांमध्ये येत असलेल्या तक्रारींच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.विजयसिंह पंडित यांनी आज तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष श्री.राधेशाम येवले यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदारांची भेट घेतली. गेवराई तालुक्यातील अपंग, निराधार, विधवा यासह इतर पात्र लाभार्थ्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. पात्र लाभार्थ्यांना तात्काळ वेतन अनुदान मंजूर झाला पाहिजे यांसह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. याबाबत आता अर्ज प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदान यांसह विविध विषयांवर विजयसिंह पंडित यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांकडून समितीच्या नावाखाली कोणी जर दलालीची मागणी करत असेल आणि लाचेची रक्कम स्वीकारत असेल, अन्य मार्गाने त्यांच्याकडून पैशाची मागणी करत असेल तर अशा लोकांच्या विरुद्ध कडक भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारे पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या पैशाची मागणी करणाऱ्यांची कुठल्याही परिस्थितीमध्ये गय करणार नसल्याची प्रतिपादन यावेळी श्री.विजयसिंह पंडित यांनी केले. संबंधित कर्मचारी आणि त्या विभागाशी संबंधित असलेल्या सर्वांची त्यांनी यावेळी कानउघडणी केली. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अत्यंत गोरगरीब आणि निराधार, अपंग, विधवा अशाप्रकारच्या व्यक्तींचा समावेश आहे. आत्ताच कोव्हीड सारख्या महामारी च्या प्रसंगातून हे सर्व गेलेले आहेत. या सर्वांवर कुठल्याही परिस्थितीत आर्थिक अन्याय झाला नाही पाहिजे यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा त्यांनी या वेळी योग्य त्या सूचना केल्या. कोणीही निराधारांची फसवणूक करू नका, त्यांच्याकडून लाच घेऊ नका, अशा प्रकारचे उद्योग कोणी करत आहे तर त्याची माझ्याशी गाठ आहे असा सज्जड दम यावेळी त्यांनी दिला.

यावेळी जालिंदर पिसाळ, दत्ता दाभाडे, शिवाजीराव डोंगरे, मन्सूर शेख, बब्बू बारुदवाले, दिनेश घोडके आदी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button