बीडबीड जिल्हा

भविष्यात वृत्तपत्रांचा कस लागणार असून त्यासाठी मूल्यवर्धनाची गरज – माहिती संचालक गणेश रामदासी

बीड, दि. ६ : कोरोना आपत्तीमुळे वृत्तपत्र व्यवसायावर संकट आलं, परंतू आलेलं संकट परिवर्तनाची संधी घेऊन येते ती एक प्रक्रिया असते. वृत्तपत्रांना बदल आणि नवतंत्रज्ञान स्वीकारावे लागले आहे. भविष्यात वृत्तपत्रांचा कस लागणार आहे. मूल्यवर्धनाशिवाय वृत्तपत्रे टिकणार नाहीत. त्यासाठी वृत्तपत्र क्षेत्राला मूल्यवर्धन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.

 

बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मासिक व्याख्यानमालेत ‘कोविडोत्तर वृत्तपत्रे’ या विषयावर बोलत होते.

 

सदर व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालये अध्यक्ष रमेश पोकळे हे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य नामदेव सानप, माहिती अधिकारी किरण वाघ, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, मार्गदर्शक संतोष मानुरकर तसेच संपादक पत्रकार आणि सदस्य, पत्रकारीतेचे विद्यार्थी, महाविद्यालयाचे अध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

 

याप्रसंगी पुढे बोलतांना माहिती संचालक श्री.रामदासी म्हणाले की, जसे मातीचा कस पाहून त्यातून कोणते पीक घेता येईल हे ठरविले जाते. मातीचा कस पाहिला जातो तसे वृत्तपत्रांचा कस लोकाश्रयातून येण्याची गरज आहे. ‘क’ वृत्तपत्राला ‘ब’ मध्ये व ‘ब’ वृत्तपत्राला ‘अ’ मध्ये जाण्यासाठी त्याचा कस वाढवरण्याची गरज आहे. या क्षेत्रातील दर्जाहीन बजबजपुरी थांबवून शुद्धीकरण होणे आवश्यक असून यामुळे मूल्यघसरण होत आहे. त्यासाठी शिक्षणाचा नियम आणि दर्जा हवा आहे असे परखड मत संचालक श्री.रामदासी यांनी व्यक्त केले.

 

ते म्हणाले, जसं सुरूवातीची पत्रकारीता वेगळी होती ती छपाई प्राथमिक अवस्थेत होती. नंतर खिळे जुळविण्याची छपाई यंत्रे, ट्रेडल मशीन आल्या. त्यानंतर डिटीपी प्रिंटीग आली, आता तर आपण मोबाईलवरही अख्खे वृत्तपत्र तयार करू शकतो हे परिवर्तन आहे. पूर्वी समाज सुधारक फक्त समाज परिवर्तनासाठी वृत्तपत्रे काढत असत परंतू काळानुरूप ते चालविण्यासाठी त्यात बदल करून त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करून, मॅनजमेंट पद्धतीने बदल करावे लागले. आज याच बदलामुळे ब्लॅक छपाई असणारे वृत्तपत्र इंटरनेटवर वेबसाईटवर रंगीत दिसतात. परंतु यु ट्युब आणि पोर्टल हे अनधिकृत असून त्याला मान्यता प्राप्त पत्रकारिता नाही अनेक प्रकरणात कारवाई करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. हे मानांकित पत्रकारिता (जर्नालिझम) नाही, अशीही माहिती या प्रसंगी श्री.रामदासी यांनी दिली.

 

मी मराठवाड्याच्या मातीतच वाढलो आहे, दिल्लीत काम करताना देखील या जाणिवेचा ठेवा मनात होता. बीड जिल्ह्याच्या मातीत पत्रकारीता आहे. येथे सामाजिक काम आहे. या मातीचे हे गुण आहे. अनेक वृत्तपत्रे व संपादक चांगले काम करत आहेत, असे गौरोवोद्गार संचालक गणेश रामदासी यांनी काढले.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातीस बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून श्री.स्वामी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर थोडक्यात अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष रमेश पोकळे यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार बालाजी तोंडे यांनी केले तर शेवटी प्राचार्य नामदेव सानप यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी संपादक पत्रकार बालाजी मारगुडे, बालाजी तोंडे, शेखर कुमार, किशन माने, सुरेश जाधव, विनोद जिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button