बीड जिल्हा

लॉक डाऊनची वेळ येऊ नये यासाठी शासकिय यंत्रणा आणि नागरीकांनी अति सावधानता बाळगावी — जिल्हाधिकारी

  बीड, :-कोरोना बाधितांनी संख्या मोठ्या गतीने वाढत असून लगतच्या जिल्ह्यांमध्ये या अनुषंगाने निर्बंध कडक केले जात आहेत, जिल्ह्याच्या ग्रामिण भागासह  शहरांमध्ये नागरीक काळजी घेताना  दिसत नाहीत. लॉक डाऊनची  वेळ येऊ नये यासाठी अतिसावधानता गरजेची असून शासकिय यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, दुकाने, व्यावसायिक, नागरीकांवर कारवाई करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले.

            जिल्हाधिकारी यांचे दालनात आज बैठक झाली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक आर. राजा, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. सूर्यकांत गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना बाबत सद्य:स्थितीची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी श्री जगताप म्हणाले, कोरोना पासून बचावासाठी मास्कचा वापर बंधनकारक असून यासह सूचना दिलेल्या नियमांचे पालन केले जाणे आवश्यक आहे. सुपर स्प्रेडर ठरणारे व्यावसायिक यांनी कोरोना तपासणी नसताना दुकाने चालू असल्यास  गुन्हे दाखल करुन दुकाने सील करावीत. जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसि्थती लॉक डाऊन लावण्याची वेळ येऊ नये यासाठी नगरपरिषद, महसूल, ग्रामविकास आणि पोलिस विभागाने तातडीने पावले उचलावीत असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सूचित केले.

          यावेळी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांचेपातळीवर उपविभागीय पालिस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी याचा नियमित आढावा घेणे, नियम भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, आरटीपीसीआर तपासण्या वाढवणे आदी सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार यांनी कोरोना तपासण्या वाढवण्यासाठी परळी, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई या शहरातील 10 खाजगी रुग्णालयांमध्ये नागरीकांच्या कोरोना आरटीपीसीआर तपासणीस परवानगी देण्याबाबत तात्काळ कार्यवाही केली जावी असे सांगितले.

     पोलिस अधिक्षक श्री. आर . राजा  यांनी निर्बंधासाठी महसूल आणि आरोग्य यंत्रणांशी पोलिस समन्वयाने काम केले जाईल असे सांगितले. अपर जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी पाटोदा, आष्टी  येथे भेट देऊन संबंधित यंत्रणांसह प्रत्यक्ष पाहाणीची माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गिते आणि निवासी उप जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीबद्दल माहिती सादर केली.  शिरुर येथे 2, यासह पाटोदा  व आष्टी येथे  दुकाने सील करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button