गेवराईबीड जिल्हा

कापूस विकला एकाने ; रक्कम जमा केली भलत्याच्या खात्यात

सीसीआयचा प्रताप ; कापसाची रक्कम द्या, नसता आत्महत्यास मागितली हतबल शेतकऱ्याने परवानगी

गेवराई :सीसीआयला कापूस विक्री केल्यानंतर त्या कापसाची १ लाख ६३ हजारांची रक्कम संबंधीत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न करता सीसीआयने ती भलत्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा केल्याचा प्रकार गेवराई येथे समोर आला आहे. तर सीसीआयने ज्या भलत्याच व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा केली, यावरून सीसीआयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर ज्या व्यक्तीच्या नावे रक्कम गेली आहे, त्या व्यक्तीने ती रक्कम खात्यातून काढून हडप देखील केली आहे. दरम्यान अडीच महिने उलटून देखील सीसीआय संबंधीत शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे व पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन ‘एक तर कापसाची रक्कम द्या, नसता आत्महत्या करण्यास परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, गेवराई येथे शासनाचे भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) खरेदी केंद्र आहे. या केंद्रावर तालुक्यातील सुशी येथील श्रीराम पेमा राठोड यांनी दि.५ जानेवारी रोजी २९ क्विंटल ८० किलो कापूस सर्व आवश्यक कागदपत्रांसह घातला होता. यानंतर या कापसाची १ लाख ६३ हजार २७२ रुपयांची रक्कम राठोड यांना पंधरा दिवसाच्या आतमध्ये खात्यात जमा होणे आवश्यक होते. मात्र महिना उलटून देखील रक्कम जमा न झाल्याने राठोड यांनी गेवराई येथील सीसीआय केंद्रावर जाऊन चौकशी केली असता तुमची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली असल्याचे सांगितले. दरम्यान याबाबत अधिक चौकशी केली असता कापसाची रक्कम हि भलत्याच व्यक्तीच्या नावे जमा केल्याचे राठोड यांच्या निदर्शनास आले. यानंतर याप्रकरणी संबंधीत अधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी तुमची रक्कम अनावधानाने दुसऱ्या व्यक्तीच्या नावे गेली असून त्या व्यक्तीकडून तघ रक्कम परत घेऊन तुम्हाला देण्यात येईल असे सांगितले. मात्र अडीच महिने उलटून गेले असताना देखील अद्यापही हि रक्कम संबंधीत शेतकऱ्याला सीसीआयकडून देण्यात आली नसल्याने राठोड हे हतबल झाले आहेत. राठोड यांनी सीसीआयचे औरंगाबाद विभागाचे उप महाप्रबंधक यांच्याकडे जाऊन देखील तक्रार केली आहे. मात्र दवे यांनी देखील संबंधीत व्यक्तीने रक्कम परत केल्याशिवाय तुम्हाला रक्कम देता येणार नाही म्हणून जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे राठोड हे हतबल झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सीसीआयची तक्रार करुन बेजबाबदार सीसीआयच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दि.26 मार्चपर्यंत रक्कम द्या, नसता आत्महत्या करण्यास परवानगी मागितल्याने सीसीआय याबाबत काय भूमिका घेतेय याकडे लक्ष लागले आहे.

—————————–

शेतकऱ्याची फरफट….
गेवराई तालुक्यातील सुशी तांडा येथील शेतकरी श्रीराम राठोड यांनी कापूस सीसीआयला घातल्यानंतर त्यांच्या कापसाची १ लाख ६३ हजार २७२ रुपयांची रक्कम राठोड यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक होते. मात्र सीसीआयने सदरील रक्कम पाचेगाव येथील एका व्यक्तीच्या नावे जमा केली असल्याचे सांगितले जाते. संबंधीत शेतकऱ्याने खात्यावर रक्कम जमा होताच ती बँकेतून काढून हडप केली. याबाबत माहिती घेऊन शेतकरी राठोड यांनी सदरील व्यक्तीस विचारणा केली असता, त्या व्यक्तीने तुम्ही मला विचारणारे कोण ? असा उलट जवाब करुन राठोड यांना पुन्हा मला त्रास दिल्यास मी तुमच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. त्यामुळे संबंधीत व्यक्तीने रक्कम तर काढून घेतली आहे, आणि सीसीआय ती व्यक्ती रक्कम परत करण्याची वाट पाहत आहे. यामध्ये मात्र शेतकरी राठोड यांची फरफट होत आहे.

————————————–

ग्रेडर म्हणतात शेतकऱ्याच्या रकमेची तडजोड केली
ज्या व्यक्तीच्या नावे चुकून रक्कम गेली आहे, याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. तसेच संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. तसेच राठोड यांच्या पैशाची आम्ही तडजोड केली असून त्यांना ती एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात जमा होईल.
– मंगेश किटुकले
ग्रेडर, सीसीआय केंद्र, गेवराई

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button