बीड जिल्हा

माणुसकी संपत चालली आहे का?

जिवाभावाची माणसे व नाती-गोती तुटली?

मित्रांनो दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे, त्यासोबतच सोशल मीडियावर रोज सकाळीच हातात मोबाईल घेतला की, बघायला मिळते भावपूर्ण श्रद्धांजली…. त्यामुळे आता भिती वाटायला लागली, आणि आपली जिवाभावाची माणसे संपत चालली…. त्यामुळे असे वाटू लागले आहे की, आपल्यामध्ये असलेली खरंच माणुसकी संपत चालली आहे का?

आपल्या जवळच्यां सोबतचे पूर्वीपासूनचे जोडले गेलेले नातेसंबंध आपण या परिस्थितीत विसरून गेलेलो आहोत. एखादा व्यक्ती जर रस्त्यामध्ये चक्कर येऊन पडलेला असेल तर आज आपण त्याच्या मदतीसाठी देखील जात नाही, इतका बदल आपल्यामध्ये झालेला आहे.

आज जर एखादा पुणे मुंबई औरंगाबाद राहणारा व्यक्ती काही अत्यावश्यक कामासाठी त्याच्या गावी येत असेल तर त्याचे नातेवाईक देखील एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्याला वागणूक देत आहेत. पण त्या सगळ्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो की कधीकाळी अडचणीच्या वेळी त्यानेच त्यांना मदत केलेली असते आणि हेच गावाकडील व्यक्ती जेव्हा कधी पुणे,मुंबई, औरंगाबाद आले असताना याच मुंबईकराने त्यांना त्याच्या छोट्याश्या घरातच राहण्यासाठी आसरा दिलेला होता…

आपण या दिवसात कसे वागत आहोत ना, या गोष्टीचा नक्कीच एकदा विचार करून बघा तुम्हालाच तुम्ही केलेल्या चुका दिसून येतील.

आज एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर आपण त्याच्या कुटुंबीयांची साधी विचारपूस पण करत नाही. पण हेच जर तो व्यक्ती रुग्णालयातून बरा होऊन परत आल्यावर आपण त्याच्यावर फूलांचा वर्षाव करण्यासाठी त्याच्या समोर उभे राहत असतो. हे जे काही अशाप्रकारे आपण वागत आहोत ना, तो फक्त एक दिखावा आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही दुःखात सहभागी होऊ शकत नाही ना, तर त्याच्या सुखात सहभागी होण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही.

आपण सर्वांनी एका गोष्टीचा नक्कीच विचार करायला हवा की, आज कोरोनाचा जो संसर्ग होत आहे आणि आज जे काही आपल्यावर संकट आले आहे ते मर्यादित काळापुरतेच असणार आहे, ते आपल्या सोबत कायमस्वरूपी नक्कीच राहणार नाही. पण याच संकटाच्या काळात आपण जे एकमेकांसोबत वागलेलो आहोत, ते नेहमी आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे.

आपल्यातली माणुसकी संपवू नका… आज दुसर्‍या कोणावर जर ही वेळ आली असेल ना, तर ती उद्या आपल्यावर देखील येऊ शकते. कारण ती वेळ आहे आणि ती कोणावरही येऊ शकते…

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button