गेवराईबीड जिल्हा

गेवराईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहा केंद्र सज्ज

- तहसीलदार आणि डॉक्टर घेत आहेत काळजी - अँड. अजित देशमुख

बीड ) कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आजच हा आकडा दीड हजाराच्या पुढे गेलेला आहे. गेवराई शहरामध्ये उपचार करण्यासाठी आणि रुग्णांच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी सहा केंद्र व हॉस्पिटल सज्ज झाले असून तहसीलदार सचिन खाडे यांची विशेष मेहनत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चिंचोले यांचेसह सर्व टीम सज्ज आहे. आता आणखी संसर्ग वाढू नये, यासाठी जनतेनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

गेवराई येथे आज तहसीलदार सचिन खाडे, डॉक्टर संजय कदम, डॉक्टर मुकेश कुचेरिया, डॉक्टर चिंचोले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये येथील असलेले रुग्णालय आणि केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांशी देखील संवाद साधण्यात आला. प्रशासन कुठे कमी पडत आहेत का ? याबाबत रुग्णांकडे देखील या सर्वांनी विचारपूस केली. तालुक्यातील प्रशासन चांगल्या रीतीने काम करत आहे, हे यावेळी दिसून आले.

कस्तुरबा कोरोना केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, भगवती टॉकीज कोरोना केअर सेंटर, आर. बी. अट्टल महाविद्यालयातील महिला केअर सेंटर, जामिया तय्यब केअर सेंटर आणि ट्रामा केअर सेंटर मधील कोरोणा केअर सेंटर अशा सर्व ठिकाणी आज संवाद साधून आवश्यक सुविधांबाबत देखील पाहणी करण्यात आली.

रुग्णांना दिल्या जात असलेल्या सेवेबाबत विशेष अशी कसलीही नाराजी असल्याचे यावेळी दिसून आले नाही. सर्व यंत्रणा आपापल्या ठिकाणी योग्य रीतीने कार्यरत असल्याचे यावेळी दिसून आले. गेवराई येथील रुग्ण बीड कडे पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन झाल्याचे यावेळी दिसत होते.

विशेष म्हणजे तहसीलदार खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कदम, आणि उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चिंचोले हे आपसात चांगला समन्वय ठेवून आहेत. तहसीलदारांच्या पुढाकारामुळे येथे ऑक्सिजन वेळेवर मिळत असल्याचे डॉक्टर कदम आणि डॉक्टर चिंचोले यांनी यावेळी सांगितले. महसुलातील काम पाहून तहसीलदारांचे आरोग्य विभागाकडे तेवढेच लक्ष असल्याचे यावेळी दिसून आले.

संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जनतेने आता आपापल्या ठिकाणीच काळजी घेणे आवश्यक आहे. वाढती रुग्ण संख्या ही चिंताजनक बाब आहे. जनतेने पथ्य पाळले नाही तर दवाखाने आणि कोरोना केअर सेंटर देखील कमी पडतील. त्यामुळे हा आजार लवकरात लवकर थांबवणे हे केवळ जनताच करू शकते. त्यामुळे जनतेने पथ्य पाळावीत आणि संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button