बीडबीड जिल्हा

कोरोना रुग्णांना शासनाच्या आदेशानुसार आहार द्या, अन्यथा रुग्णांनी तक्रारी कराव्यात

- उच्च आहार प्रकृती सुधारतो - अँड. अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) कोरोना रुग्णांसाठी आहाराचे दैनंदिन वेळापत्रक शासनाने ठरविले आहे. त्याप्रमाणे कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना आहार देण्याचे सक्त आदेश आहेत. तशा प्रकारचे टेंडर देखील शासनाने दिले आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचा आणि शासनाने ठरविलेल्या वेळापत्रका प्रमाणे जर आहार मिळत नसेल तर संबंधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांनी यासंबंधी लेखी तक्रारी नोंदवाव्यात. आपला हक्काचा आहार घ्यावा, असे ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

रुग्णांना पौष्टिक आहार देण्याचे आदेश आहेत. त्यामध्ये सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीनही वेळेला काय काय देणे बंधनकारक आहे ? यासंदर्भातील माहिती प्रत्येक कोरोणा वॉर्डांमध्ये सकृत दर्शनी दिसेल अशा दर्शनी भागावर लावण्याची आवश्यकता आहे. मात्र यंत्रणेने अजून जनतेला हे कळु दिले नाही. ही माहिती व आहार पुढील प्रमाणे द्यावयाचा आहे.

सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी सकाळी सात वाजता एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे मध तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी सात वाजता एक ग्लास पाण्यामध्ये दहा मिली कोरफड ज्यूस द्यावयाचा आहे.

सोमवार ते रविवार सकाळी साडे आठ ते साडे नऊ या वेळेमध्ये पुढील आहार द्यावयाचा आहे. सोमवार ग्रीन टी, मुगदाळ,मोसंबी. मंगळवार ग्रीन टी, इडली सांबर, अननस. बुधवार तुळशी टी, मटकी, टरबूज. गुरुवार तुळशी टी, पोहे, मोसंबी. शुक्रवार ग्रीन टी, उपमा, आंबे. शनिवार तुळशी टी, अंडे / राजमा, टरबूज. रविवार ग्रीन टी, हरभरा, खरबूज याप्रमाणे नाष्टा द्यायचा आहे.

दुपारी एक वाजता सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार पनीर भाजी, फुलका, वरण-भात, सलाद, ( हिरव्या पालेभाज्या सह )द्यावयाच्या आहेत. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सोयाबीन भाजी, फुलका, वरण-भात, सलाद ( हिरव्या पालेभाज्या सह ) द्यावयाचा आहे.

दुपारी चार ते पाच च्या दरम्यान सोमवार ते रविवार पर्यंत दररोज आयुष काढा, अद्रक चहा द्यावयाचा आहे.

रात्री आठ वाजता सोमवार ते रविवार पुढील प्रमाणे जेवण द्यावयाचे आहे. सोमवारी खिचडी, कढी, सलाद, चिक्की. मंगळवारी व्हेज पुलाव, जवस चटणी, सलाद, शेंगदाणा लाडू. बुधवारी सोयाबीन भाजी, फुलका, सलाद. गुरुवारी पनीर पुलाव, सलाद / शेंगदाणा लाडू. शुक्रवार घी – खिचडी, सलाद आणि चिक्की. शनिवारी व्हेज पुलाव, जवस चटणी, सलाद / शेंगदाणा लाडू आणि रविवारी सोयाबीन भाजी, फुलका, सलाद याप्रमाणे जेवण द्यायचे आहे.

सोमवार ते शनिवार पर्यंत रात्री नऊ वाजता दररोज एक कप हळद दूध द्यायचे आहे. याप्रमाणे रुग्णांना जेवण देण्याचे आदेश शासनाने दिले असून हे आदेश देखील बीड जिल्ह्याला लागू आहेत. नव्याने स्थापन होत असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये याप्रमाणे जेवण दिले जाते का ? हे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी तपासावे.

जेवणाचा खर्च शासन करत असल्यामुळे याप्रमाणे जेवण देऊन रुग्णाची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. जर याप्रमाणे जेवण दिले जात नसेल तर शासकीय यंत्रणेला याबाबत त्वरित कळवावे. म्हणजे संबंधित कंत्राटदाराला यंत्रणा जाब विचारेल आणि योग्य ते जेवण रुग्णांपर्यंत पोहोचल्याने रुग्णांच्या आजारात ताबडतोब सुधारणा होईल.

कोवीड सेंटर चालवणाऱ्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो. रुग्ण सेवेसाठी आपण पुढे आलात, ही बाब उल्लेखनीय आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटना, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अन्य तज्ञांनी जे जेवण रुग्णांना द्यावयाला सांगितले आहे व ज्याचे टेंडर काढलेले आहे, तेच जेवण रुग्णांना द्यावे. निकृष्ट दर्जाचे जेवण जर दिले गेले तर रुग्णाची परिस्थिती लवकर सुधारणार नाही, याचीही नोंद घ्यावी.

कॉविड केअर सेंटर चालवणे हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तेथे मुबलक पाणी, स्वच्छता ग्रह, वर दर्शविल्याप्रमाणे जेवण वगैरे सह ज्या – ज्या रुग्णांना सुविधा देणे बंधनकारक केले आहे, त्या सुविधा केअर सेंटर चालकांनी द्याव्यात. अन्यथा कोविड सेंटर चारा छावणी प्रमाणे बदनाम होईल. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जाते. त्यामुळे रुग्णांची काळजी प्रत्येकाने घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

* रुग्णांना शासनाने ठरवलेला आहार देणे बंधनकार
* कोरोना केअर सेंटरने रुग्नसेवा ईश्वर सेवा समजावी
* आवश्यक तेवढे स्वच्छतागृह, मुबलक पाणी द्यावे
* रुग्नसेवा मिळत नसेल तर रुग्णांनी तक्रार करावी
* रुग्णांना आहारासोबत मानसिक आधार गरजेचा
* केअर सेंटर चारा छावणी प्रमाणे बदनाम करू नका
* आमचे जिल्ह्यात सर्वत्र लक्ष – अँड. अजित देशमुख

 

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button