महाराष्ट्र

“ताऊक्ते” चक्रीवादळादरम्यान नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सूचनांचे काटकोर पालन करावे-पालकमंत्री कु.आदिती तटकरे

नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध

अलिबाग, :- रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर दि.16 व 17 मे 2021 या कालावधीत “ताऊक्ते* चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाच्या शक्यतेचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात आपण जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून जिल्हा प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.तरी नागरिकांनी काळजी करू नये, जिल्हा प्रशासन देत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.
पालकमंत्री कु.तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाकडून “ताउक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यांनी समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांची सुरक्षा, जिल्ह्यातील ऑक्सीजन प्लांट ची सुरक्षा, सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांची व्यवस्था, महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समन्वय इत्यादी बाबींविषयी जिल्हा प्रशासनास महत्त्वाच्या सूचना दिल्या.
तसेच त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रामुख्याने मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये, आपले घर सुरक्षित असल्याची खात्री करून घरातच सुरक्षित राहावे, घराबाहेर पडू नये, आपले घर कच्च्या स्वरूपाचे असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री घेवून तात्काळ स्थलांतरीत व्हावे, त्याचबरोबर आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांनाही सुरक्षित स्थळी हलवावे, चक्रीवादळाबाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, चक्रीवादळ व अतिवृष्टी असे दुहेरी संकट टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, ग्रामकृतीदलाच्या व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, आदिवासी बांधवांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आपत्कालीन संपर्क यंत्रणेची मदत घ्यावी.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे की, सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी मिळून या संकटाचा यशस्वी मुकाबला करू. आपण सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहोत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button