बीड जिल्हा

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी ३०० कोटींचा पतपुरवठा करावा

धनंजय मुंडे यांची नाबार्ड व राज्य बँकेकडे मागणी

पुणे) : बीड जिल्ह्यातील शेतकरी कोरोना आणि महागाईमुळे त्रस्त आहेत, खरीप हंगामाच्या पूर्वतयारी साठी त्यांना पतपुरवठा करण्याची आवश्यकता आहे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यासाठी नाबार्ड कडून ३०० कोटी रुपयांची फेरकर्ज मर्यादा मंजूर करावी अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्यांनी बँकेच्या प्रशासकीय मंडळासह नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित उपस्थित होते.

बीड जिल्हा बँकेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी ३०० कोटी रुपये नाबार्डकडून फेरकर्ज उपलब्ध करावे या मागणीसाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुणे येथील नाबार्डच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक, सदस्य अशोक कदम, अशोक कवडे यांचेसह नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक एल.एल.रावल, रावत, व्यवस्थापक रश्मी, श्रीनिवास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बँकेच्या वतीने नाबार्डला फेरकर्ज मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला. बँकेची आर्थिक परिस्थिती आणि संकटकाळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. नाबार्डच्या वतीने मुख्य सरव्यवस्थापक रावल यांनी बँकेच्या प्रस्तावबाबत सत्वर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राज्य सहकारी बँकेकडून तात्काळ प्रस्ताव मागविण्यात येईल असेही सांगितले.

बीड जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जोडलेले आहेत, शासनाने बँकेला २६० कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीत शेतीची अर्थव्यवस्था कोलमडून गेल्याने आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईसारख्या संकटामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे, त्याला आधार देण्यासाठी यावर्षी उद्दिष्टांपेक्षा अधिक पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या. जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेकडे यापूर्वी २०० कोटी रुपये फेरकर्ज मर्यादा नाबार्डच्या हिश्यातून मंजुरीचा प्रस्ताव सादर केला, मात्र पूर्वीच्या संचालक मंडळाने सुमारे १६८ कोटी रुपयांच्या ठेवी वाटप केल्यामुळे बँकेचा सिडी रेशोचे प्रमाण वाढल्याने पतपुरवठा होण्यास अडचणी आल्या. याबाबत माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ राज्य सहकारी बँक आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून माहिती घेतली होती. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले पाहिजे या भूमिकेतून त्यांनी आज नाबार्ड मध्ये बैठक घेतली.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीला नाबार्ड आणि राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हा बँकेने खरीप हंगामाचे पीककर्ज वाटप केले असून शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मागणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button