गेवराईबीड जिल्हा

पोस्ट कोविड रुग्णांवर उपचारासह त्यांचे समुपदेशन करा – अमरसिंह पंडित

कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य किट देणार, उपजिल्हा रुग्णालयात घेतली आढावा बैठक

*पोस्ट कोविड रुग्णांवर उपचारासह त्यांचे समुपदेशन करा – अमरसिंह पंडित*
==============
*कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य किट देणार, उपजिल्हा रुग्णालयात घेतली आढावा बैठक*
============
गेवराई, दि.२९ (प्रतिनिधी) कोरोना आजारातून बरे होणार्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस, उच्च रक्तदाब, डायबेटीजसह अनेक आजारांची लक्षणे दिसत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड रुग्णांसाठी वेगळा कक्ष तयार करून तेथे रुग्णांवर उपचार आणि त्यांचे समुपदेशन करण्याची मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केली. कोरोना आजारातून बरे होणार्या रुग्णांना शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत आरोग्य किट देणार असल्याची माहिती देवून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयात आयोजित आढावा बैठकीत अमरसिंह पंडित यांच्यासह रुग्णसेवा समितीचे सदस्य व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच कोरोना आजारातून बरे होणार्या रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस, उच्च रक्तदाब, डायबेटीज, अशक्तपणा यांसह अनेक आजारांची लक्षणे दिसून येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी शनिवार, दि.२९ रोजी उपजिल्हा रुग्णालयास भेट देवून संबंधित डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.महादेव चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, रुग्णसेवा समितीचे अ‍ॅड.सुभाष निकम, कडुदास कांबळे, प्रशांत गोलेच्छा, दादासाहेब घोडके, संदिप मडके, किशोर कांडेकर, अक्षय पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे, प्रदिप जोशी, अमोल वैद्य, अविनाश इंगवले, अर्जुन सुतार, रंजित सराटे, बाळासाहेब सानप, वसीम फारोकी यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कामाची माहिती घेवून उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले.

माजी आ.अमरसिंह पंडित यांनी पोस्ट कोविड आजारांबाबत चिंता व्यक्त करताना या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य सेवा व उपचार मिळण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या बाबत आपण काय करू शकतो या संदर्भाने झालेल्या चर्चेतून त्यांनी यापुढे कोरोना आजारातून बरे होणार्या रुग्णांना शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत आरोग्य किट उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली. या किटमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधी, टुथब्रश, पेस्ट, साबन आदींचा समावेश असणार आहे. पोस्ट कोविड रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी र.भ.अट्टल महाविद्यालयात तज्ञ डॉक्टरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट रुग्णांशी संवाद साधण्या बाबतची सुविधा उपलब्ध करून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याचे प्रसारण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना आजारातून बरे होणार्या रुग्णांना होत असलेल्या संभाव्या धोक्याच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयासह रेडिओ आदी माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना अमरसिंह पंडित यांनी देवून यासाठी लागणारा खर्च आपण करण्यास तयार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

आरोग्य प्रशासनाबरोबर होणार्या बैठकांच्या माध्यमातून केवळ उपचाराचे डोस न पाजता थेट त्यांना विविध मार्गांनी सहकार्य करण्यावर माजी आ.अमरसिंह पंडित यांनी भर दिला. आरोग्य किट, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व जनजागृतीसाठी लागणारा निधी खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शविल्यामुळे तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि अमरसिंह पंडित यांच्या भुमिकेची तुलना तालुक्यात होत असून अमरसिंह पंडित यांच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. या बैठकीत रुग्णसेवा समितीच्या सदस्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडले. प्रशासनाच्यावतीने डॉ.चिंचाळे आणि डॉ.कदम यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button