बीडबीड जिल्हा

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची टगेगीरी खपवून घेतली जाणार नाही – ॲड. शेख शफीक भाऊ

बीड ) – शुक्रवार दिनांक १८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्हा दौरा अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला. याबद्दल बोलताना एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख भाऊ यांनी म्हटले आहे की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मुस्लिमांची फक्त मते हवी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम आरक्षणाचे निवेदन घेण्यास दोन मिनिटे वेळ दिला नाही.आपातकालीन काळात आरोग्य सेवा दिलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांवर सुद्धा उपमुख्यमंत्री आणि आरोग्य  मंत्री राजेश टोपे या दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत लाठीमार म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि असून यापुढे अशी टगेगिरी चालू देणार नाही. असे परखड मत व्यक्त केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सेक्युलर नावाचा बुरखा पांघरून आपापल्या पोळ्या भाजून घेत आहे. जनतेच्या सुख-दुःखाचे यांना काही देणेघेणे आहे असे वाटत नाही. म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर या दोन्ही मंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाविषयी निवेदन घेऊन आलेल्यांचे निवेदन स्वीकारले नाही तर गेल्या पंधरा महिन्यांपासून आरोग्य विभागात हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा दोन मिनिटे भेट दिली नाही. यामुळे बिथरलेल्या कर्मचाऱ्यांच्या कोलाहलामध्ये पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामध्ये लाठीचार्ज करताना जरी प्रथमदर्शनी पोलीस दिसत असले तरी यात पोलिसांचा नाही तर येथे आलेल्या मंत्र्यांचा दोष आहे. ज्यांच्या तुसडेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी पक्ष फक्त मतांपुरता मुस्लिम समाजाचा वापर करून घेत आहे. मात्र मुस्लीम समाजाच्या प्रश्नांचे त्यांना कुठलेही सोयरसुतक नाही हे काल झालेल्या बैठकीत दिसून आले. आता मुस्लिमांनी ठरविण्याची वेळ आली आहे की, त्यांनी अशा राजकारण्यांना व पक्षांना  मते देऊन कुठपर्यंत थारा द्यायचा ? तसेच कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा देणाऱ्या हंगामी पुरुष व महिला कर्मचाऱ्यांवर आरोपींसारखा झालेला लाठीमार हा विनाशकाले विपरीत बुद्धि सारखा असून आमच्या जिल्ह्यात येऊन निवेदन कर्त्यांना बोलण्यास वेळ न देणे, जिल्ह्यातील आरोग्य सेवकांवर स्वतःच्या  चुकीमुळे लाठीमार होणे यापुढे सहन केले जाणार नाही. अशी टगेगिरी खपवून घेतली जाणार नाही. असे परखड मत ॲड. शेख शफिक भाऊ यांनी व्यक्त केले आहे.
पालकमंत्री व स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे तरीही …..!
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे दोन्हीही राष्ट्रवादी पक्षाचे. तरीही यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मुस्लिम आरक्षण व हंगामी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवेदन देऊन दोन शब्द बोलण्याकरीता पाच मिनिटे काढून देवू शकले नाही ! याला हलगर्जीपणा म्हणावा की कपाळकरंटेपणा असे खोचक वक्तव्य ही शेख शफीक यांनी केले आहे.
आरोग्य सेविकांवर लाठीचार्ज स्त्री जातीचा अपमान
स्वतःचे जीव धोक्यात घालून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह हंगामी पुरुष कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना काळात 24 तास रुग्णांच्या आरोग्य  सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांवर उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री च्या तुसडेपणामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये पुरुष कर्मचाऱ्यांसह महिलांवरही मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाल्याने हा स्त्री जातीचा अपमान आहे. याचा तीव्र शब्दात एआयएमआयएम पक्ष जाहीर निषेध करतो आणि यापुढे अशा प्रकारची कारवाई आणि मंत्र्यांची टगेगिरी सहन केली जाणार नाही. असा इशाराही शेख शफीक यांनी दिला आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button