ब्रेकिंग न्यूज

फायनान्स कंपनीकडून रिक्षाचालकांची होणारी लुट थांबवा

महाराष्ट्र रिक्षा पंचायत बीडच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

बीड )ः- कोरोना महामारीमुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आलेले असून त्याला अपवाद अ‍ॅटोरिक्षा चालक देखील आहेत. कोरोनापूर्व काळात फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून बर्‍याचजणांनी अ‍ॅटोरिक्षा खरेदी करून आपल्या व्यवसायाला सुरूवात केली होती. परंतु गेल्या वर्षभरापासून सर्वच व्यवसाय ठप्प झाल्याने रिक्षाचालकांचे अतोनात हाल होतांना दिसत आहेत. सततच्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांना कर्ज फेडणे जिकीरीचे झालेले असून फायनान्स कंपनीकडून कर्जावसुलीची कोणतीही लेखी नोटीस न देता खाजगी गुंडा मार्फत रिक्षा जप्त करून अज्ञातस्थळी लावण्यात येत आहेत. या होणार्‍या कर्जाच्या मागणीमुळे रिक्षा चालकांचे कंबरडे मोडून संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. तसेच ऑफलाईन असणार्‍या परवाना धारक रिक्षा चालकांना अनुदानाचा लाभ शासनाने द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र रिक्षा पंचायत बीड जिल्ह्याच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. यामुळे रिक्षाचे कर्जाचे हाप्ते थकलेले असून फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून हप्ता भरण्यास तगादा लावण्यात येत आहे. कोणतीही नोटीस न देता खाजगी गुंड मार्फत रिक्षा जप्त केली जात आहे. तसेच रिक्षा जप्त करतांना फायनान्स कंपनीचे कर्मचारी देखील उपस्थित नसतात. ओढून नेण्यात आलेल्या प्रत्येक रिक्षाचालकास रक्कम तीन हजार रूपये चार्ज घेण्यात येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील रिक्षाचालक त्रस्त झालेले असून फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभारास प्रशासनाने निर्बंध लावावेत व रिक्षाचालकांची लुट थांबवावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पदाधिकारी सुग्रीव शिंदे, संजय जावळे, दिलीप पवार, शेख अन्सार, सुनील इंगोले, गणेश वैद्य, अमोल घोलप, किरण झाडीवाले, हबीब खान विठ्ठल चव्हाण, सय्यद खलील, मुकेश फाळके, प्रभाकर निकम, प्रकाश ससाणे, नवनाथ आवारे, सय्यद अकबर, गोपाळ पवार, शाम सत्तार, भारत आखाडे, दिगांबर गिरी, बबन वीर, गणेश टाटोर, नितीन डिसले, महादेव कुलथे, जगन्नाथ बावणे, विकास गावडे, नितीन गवळी, जावेद खान आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

ऑफलाईन असणार्‍या परवाना धारक रिक्षा चालकांना अनुदानाचा लाभ द्या
गेल्या दिड वर्षापासून लॉकडाऊनच्या झळा रिक्षा चालकांना बसत असून आर.टी.ओ कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या अनुउपस्थितीमुळे बर्‍याच परवानाधारक रिक्षा मालकांनी कागदपत्र नुतनीकरणास देवूनही त्यांची कामे झालेली नाहीत या काळात प्रत्येक रिक्षा चालकांनी वाहन विमा काढलेला होता त्यांची मुदतही संपलेली आहे. याचा भुर्दंड रिक्षा मालकांनी सोसलेला आहे. परवाना ऑनलाईन असेल तरच मंजूर झालेले अनुदान मिळणार असेल तर ज्याच्याकडे ऑफलाईन परवाने आहेत त्यांनाही अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे. ऑफलाईन परवानाधारकांची नोंद आर.टी.ओ कार्यालयात आहे अशा रिक्षा मालकांनाही अनुदानाचा देण्यात यावा अशी मागणी देखील महाराष्ट्र रिक्षा पंचायत बीड जिल्ह्याच्यावतीने करण्यात आली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button