बीड जिल्हा

अखेर श्रेय घेण्यासाठी कुंभकर्णी झोपेतून आमदार जागे झाले

आ.पवार यांच्या पत्रकबाजीला विजयसिंह पंडित यांचे सडेतोड उत्तर

गेवराई, ) ः- मोदी लाटेत आमदार झालेल्यांनी पाच वर्षे केवळ पंडितांच्या नावचा शिमगा करून स्वतःच्या अकार्यक्षमतेवर पांघरून घातले. सोशल मिडीयात कामे मंजुर झाल्याचे वाचून श्रेय लाटण्यासाठी का होईना कुंभकर्णी झोपेतून अखेर आमदार जागे झाले. कोरोनाचा कठीण संक्रमण काळ झोपा काढत घालणार्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये अशा कडक शब्दांत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गेवराईचे भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्या पत्रकबाजीला सडेतोड उत्तर दिले.

एैन पावसाळ्यात सुध्दा गेवराईकरांना पिण्याचे पाणी मिळेना, अकार्यक्षम आणि भ्रष्ट कारभारामुळे गेवराई शहराचा उकीर्डा झाला, केवळ स्वतःच्या प्लॉटींग जागेपुढे नंदनवन केले, शासनाच्या जमीनीवर अतिक्रमण करून भाडे वसुली चालू केली. मागील पाच वर्षांत झालेल्या रस्त्यांची चाळणी झाली, खड्ड्यात रस्ते सापडेनात, दलालीमुळे मिंदे झालेल्यांना गुत्तेदारांची तक्रार करण्याची सोय राहिली नाही. डांबरीकरण कामाच्या वेळी मशिनरीवर उभे राहून फोटोसेशन करणारे आता त्या रस्त्याकडे फिरकेनासे झाले आहेत. ग्रामीण भागातील लोक तोंडावर बोलू लागल्यामुळे कोरोनाच्या नावाखाली निवडून आलेले लोकप्रतिनिधी दार लावून बसले आहेत. भाजपच्या ताब्यातील पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला, दलाली दिल्याशिवाय कागद हालेनासा झाला या सर्व प्रकारावर तथाकथित सम्राट तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. दुसर्याच्या नावाने शिव्याशाप देणे एवढाच अजेंडा यांचा सुरु आहे. या भकास सम्राटांना दुसर्यांदा निवडून दिल्याचा पश्‍चाताप मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे भ्रष्ट सम्राटांना राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, तुमच्या पत्रकबाजीला जशास तसे उत्तर देवू असा सज्जड इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला आहे.

कोरोनाच्या कठीण संक्रमण काळात सामान्य जनतेला आम्ही जीवनावश्यक वस्तुचे वाटप करत असताना हे भ्रष्ट सम्राट रेशनचा माल काळ्या बाजारात विकत होते, रुग्णालयांना आम्ही यंत्रसामुग्री देत होतो, त्यावेळी हे कर्तव्यशुन्य सम्राट नगर परिषदेत बोगस बिले काढत होते. विकास काय असतो ? त्यासाठी काय पाठपुरावा करावा लागतो ? याचे ज्ञान नसलेल्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये. असे सांगताना विजयसिंह पंडित म्हणाले राष्ट्रीय महामार्ग २११ ते शिंदेवाडी-निपाणीजवळका-पाचेगाव-तळवट बोरगाव-जळगाव मंजरा या रस्त्यांच्या मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न केले, पाठपुरावा केला. या माध्यमातून हा रस्ता मंजुर झाला याचे कोणीही श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, तालुक्यात दर्जेदार विकास व्हावा यासाठी आम्ही कटिबध्द असून यापुढे ऐर्यागैर्यांच्या टिकेला भिक घालणार नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button