बीडबीड जिल्हा

सोनदरा गुरुकुलचा प्रवास

  • सोनदरा गुरुकुल सुरू होऊन आज ३५ वर्षे पूर्ण होत आहेत…या निमित्ताने आ. सुदाम काकांनी केलेले मनन:

॥ गुरूपौर्णिमा ॥

कदंबवन
२१ जुलै २०२१
दुः१.४०

  • गुरुकुलाचे सर्व माजी विद्यार्थी ,पालक , कार्यकर्ते,स्नेही व हितचिंतक .सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

बरोबर पस्तीस वर्षांपूर्वीचे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे दृष्य आज माझ्या डोळ्यासमोर तरळते आहे.
विद्यार्थ्याच्या मदतीने बांधलेल्या चार झोपडया. एक पाल्याचा मांडव.
रिमझीम पाऊस येत होता. डोमरी, रोहतवाडी गावातून शंभरेक लोक व २३ विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत होता. बीडचे जिल्हाधिकारी मा. सुधाकर जोशी तलावाखालून छत्री घेऊन पायी आले होते. त्यांच्या शुभहस्ते औदूंबराचे रोपटे लाऊन उद्घाटन झाले. आ. दादा जोशींनी प्रस्तावना केली. मला मनोगत व्यक्त करण्यास सुचवले. मी बोलण्यासाठी उभे राहीलो. शब्दांऐवजी अश्रू बोलते झाले…. वाहाते झाले. पावसाऐवजी आश्रूत एका कल्पवृक्षाचे बीजारोपन झाले.
एका अनघड माणसाच्या जीवनाचा नवा प्रवास आज सुरू झाला होता. कुठं चाललो हे माहीत नव्हतं, काय होणार माहीत नव्हतं. काय करायचं कळत न०हतं.
एका अंधार गुहेतील प्रवास सुरु झाला. या प्रवासात श्रद्धेय नानाजी पासून अनेक ऋषी तुल्य व्यक्ती , संस्था व पुस्तकांनी प्रकाश दाखवला.कार्यकर्त्यानी , नातेवाईकांनी जीवाला जीव दिला .
हा प्रवास निरंतर सुरू आहे. या प्रवासात कधी दगडाळ दऱ्याखोऱ्या लागल्या. कधी हिरवळीचे शितल नदीकाठ लागले. आता अंधार गुहा संपून तेजस्वी शुभ सकाळ झाली आहे. आज पस्तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
गुरुकुलात मी सोनदऱ्यातल्या एका शिलेसारखा निश्चल उभा आहे.
गत पस्तीस वर्षात जे झालं ते तुम्हा सर्वांच्या प्रेमाचा परिणाम आहे.
मुलं पालकांनी पाठवली नसती,
मुलं राहीली नसती,
कार्यकर्ते आले नसते,
स्नेह मिळाला नसता,
देणग्या मिळाल्या नसत्या तर मी काय केलं असतं?
गुरुकुल हे तुमच्या प्रेमाचा चमत्कार व आविष्कार आहे. यात मी केवळ निमित्तमात्र आहे.
गुरुकुलाचं गुरुकुलपण म्हणजे *पावित्र्य* – ते सांभाळण्यास आपणा सर्वांना यश आलं. हेच गुरुकुलाचं गुरुकुलपण. बाकी साऱ्या मर्यादा असतांना समाजाने गुरुकुल स्वीकारलं , गौरवीलं.
म्हणूण समाजरुपी गुरूची आज कृतज्ञता व्यक्त करतो.
एका ज्ञान मंदिराचा पाया बांधायला पस्तीस वर्षे लागली. कारण पाया पक्का बांधायचा होता कारणं हे ज्ञान मंदिर चिरंतन व्हावं हा हेतू होता. कसल्याही वाऱ्या वादळाने मंदीर डगमगू नये. भुकंपाच्या धक्क्यालाही भीक घालू नये म्हणून ही तीन तपाची तपश्चर्या ! आज सर्वांच्या चरणी समर्पित करत आहे .
माझ्या साऱ्याचं मर्यादा होत्या. त्या मर्यादांची जाणीव मला होती.मी केवळ शेंदूर थापलेला एक दगड आहे. हे मी जाणून आहे. हा पायातील दगड पायातच राहील.
आता हे मंदीर खऱ्या अर्थाने उभविण्यास आरंभ करण्याची जबाबदारी तुमच्यापैकी प्रत्येकांची आहे. सर्व समस्याची मुळं शिक्षणात असतात असं म्हटलं जातं . समाजातील, देशातील आणि जगातील समस्या सोडविणारी शिक्षण प्रणाली शोधणं व ती कार्यान्वीत करणं हे गुरुकुलासमोरचं आव्हान आहे. हे आव्हान आपणा सर्वानां मिळून पेलायचं आहे .
यासाठी मी काय करू शकेल ?
हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे .
अंशतः तरी गुरुकुलाच्या उभारणीत समर्पित व्हायचं आहे. हे समर्पण मनाचं व वेळचे अपेक्षीत आहे .
तुम्हा सर्वांची संख्या मिळून काही हजारात आहे . मला याची तींव्र खंत आहे.मी तुमचं संघटन बांधू शकलो नाही. तुम्हाला भावनेने जोडून ठेऊ शकलो नाही. तुमच्या सुख दुःखात सहभागी होऊ शकलो नाही. कारण माझ्या मर्यादा , नेतृत्वगुणांचा अभाव व अज्ञान या कारणांनं हे झालं. त्याच्या वेदना मला आहेत व त्याबद्दल खरच मनापासून तुमच्यापैकी प्रत्येकाची क्षमा मागतो.
स्वतःच्या, परिवाराच्या व गुरुकुलाच्या उज्वल भविष्यासाठी मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला प्रत्येकाने विचारावा . आपल्या आतच आपला खरा गुरु असतो. तो आपल्याला रास्त मार्गदर्शन करतो . आपण आपल्या खऱ्या गुरुचा आवाज ऐकत नाही. तो चीनून टाकतो. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आतल्या गुरुचा शोध घ्यायला सुरवात करू . तो खात्रीने सापडेल . आपणास खात्रीने मदत करील यावर माझी श्रद्धा आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समर्पण करण्याची पंरपंरा आहे. गुरुकुलासाठी वर्षातून काही वेळेचे समर्पण करू शकू का ? असंही मनन व्हावं .
हे समर्पण मिनीटापासून महिन्यापर्यंत असू शकतं.
घरातील सर्व संदस्यांसह सर्वांना शुभेच्छा !

-सुदाम भोंडवे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button