बीडबीड जिल्हा

बीड जिल्ह्यातून जाणा-या तीन रेल्वे मार्गाच्या कामाचे केंद्रीय

रेल्वे राज्यमंत्र्यांना अमरसिंह पंडित यांनी घातले साकडे

बीड) अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, सोलापूर-बीड-जळगाव या सर्व्हेक्षण पूर्ण होवून तत्वतः मंजुरी मिळालेल्या रेल्वे मार्गास निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष काम सुरु करावे यांसह बेलापूर-गेवराई-परळी या स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करून त्यास मंजुरी देण्याची आग्रही मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली. नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आ.सतिष चव्हाण उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अतिशय सकारात्मकरितीने प्रतिसाद देवून कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.

बीड जिल्ह्यातून जाणा-या तीनही प्रस्तावित रेल्वे मार्गांच्या कामास चालना मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांची मंगळवार, दि.३ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या बाबत अमरसिंह पंडित यांनी सविस्तर लेखी निवेदन देवून रेल्वे राज्यमंत्री यांच्याशी या कामाबाबत सविस्तर चर्चा केली. मराठवाड्याच्या भुमिपूत्राकडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी आल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील रखडलेले तीनही रेल्वे प्रकल्प आपल्या कारकिर्दीत पूर्ण होतील असा विश्‍वास बीड जिल्हावासियांना असल्याची भावना माजी आ.अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे आ.सतिष चव्हाण उपस्थित होते. रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांनी या बाबत सविस्तर चर्चा करून अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मार्गाच्या कामा बाबत सत्वर कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.
माहे फेब्रुवारी १९९७ मध्ये मंजुरी मिळालेल्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सन २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याची आठवण अमरसिंह पंडित यांनी करून दिली. या कामासाठी राज्य शासनाचा हिस्सा शासन देत असून रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेवून हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोलापूर-तुळजापूर-बीड-जालना-जळगाव या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण झाले असून त्यास मार्च २०१९ मध्ये रेल्वे मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिली आहे. दक्षिण आणि उत्तर भारत जोडणार्या या रेल्वे मार्गामुळे जालना येथील स्टील उद्योगाला मोठा औद्योगिक लाभ मिळणार असून या रेल्वे मार्गामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे सांगून या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी केली.

बेलापूर (श्रीरामपूर)-गेवराई-परळी या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आले. दोन मोठ्या जंक्शनला
जोडणा-या या रेल्वे मार्गामुळे ऊस आणि कापूस या पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग जोडले जाणार आहेत. पर्यटन आणि तिर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच व्यापार वृध्दीसाठी सुध्दा या रेल्वे मार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगून मराठवाडा विभागाचा पृष्ठभाग वाहतुकीच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी तीनही रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचे आहेत. मराठवाड्याचा सर्वांगिन विकास आणि आर्थिक संपन्नतेबरोबरच सामाजिक जीवन प्रणाली सुध्दा गतिमान होण्यास या रेल्वे मार्गामुळे मदत होणार असल्यामुळे ही कामे तात्काळ मंजुर करण्याची आग्रही मागणी अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button