बीडबीड जिल्हा

पक्ष संघटनेतील प्रत्येक सहकाऱ्याची निवडणूक व संघर्ष मी माझाच समजून म्हणून लढतो – धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ना. धनंजय मुंडे, जीवनाराव गोरे यांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

  • चांगला नेता तोच जो चांगला कार्यकर्ता घडवतो – जीवनराव गोरे

बीड ) —- : पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे प्रत्येक निवडणुकीत बुथपासून सर्वच ठिकाणी महत्वाचे योगदान असते, माझ्या या सर्व सहकाऱ्यांची प्रत्येक निवडणूक ही माझी निवडणूक व त्यांचा प्रत्येक संघर्ष हा माझा संघर्ष आहे असे समजून मी पक्ष संघटनेत काम करतो, असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा कार्यकारिणीची बैठक पक्षाचे निरीक्षक ज्येष्ठ नेते श्री. जीवनराव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी ते बोलत होते.

पक्षातील सर्व आघाड्यांच्या रचना व कार्यकारिणी पूर्ण करून संघटना बळकट करण्याची गरज असल्याचे यावेळी ना. मुंडे म्हणाले. तर एक चांगला कार्यकर्ता घडायला अनेक वर्षांचा काळ लागतो, पण चांगला कार्यकर्ता घडवू शकतो तोच चांगले नेतृत्व करू शकतो असा कानमंत्र श्री. जीवनराव गोरे यांनी यावेळी दिला.

या बैठकीस आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब काका आजबे, आ. संजयभाऊ दौंड, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आ. पृथ्वीराज साठे, मा.आ. उषाताई दराडे, मा.आ. सुनीलदादा धांडे, मा.आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांसह महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी तसेच विविध फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत आहे, त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदींना विविध अपेक्षा आहेत, कोविड विषयक निर्बंध जसजसे कमी होतील तसतसे या अपेक्षा पूर्ण होतील. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याची सूक्ष्म स्तरावरून तयारी करण्याचे आवाहनही ना. मुंडेंनी यावेळी केले.

खा. शरदचंद्रजी पवार व महाविकास आघाडीच्या आभाराचा ठराव

बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ऊसतोड कामगार आहेत. महाविकास आघाडी सरकारने खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मध्यस्तीने ऊसतोडणी मजुरीचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडवला त्याबरोबरच लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उभारणीला गती व निधी दिला. कायमस्वरूपी निधी, वसतिगृह योजना यासर्व बाबींसाठी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खा. शरदचंद्रजी पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार मानायचा ठराव या बैठकीत मांडून संमत करण्यात आला.

खासदार ताईंच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार…

बीड जिल्ह्याच्या खासदार ताईनी देशाच्या सार्वभौम सभागृहात सर्वच जण मराठा समाजाबद्दल का बोलत आहेत अशा स्वरूपाचे वक्तव्य केले, ही बाब अत्यंत गंभीर व जातीय आकस व्यक्त करणारी आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्याला मतदान केले असताना एका जातीबद्दल आकस दाखवणे योग्य नाही. बीड जिल्ह्यातील जनता अशा नेत्यांना योग्य जागा दखवुन देईल, अशा शब्दात ना. धनंजय मुंडे यांनी खा. प्रीतमताई मुंडे यांच्या लोकसभेतील वक्तव्याचा समाचार घेतला.

ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षणाच्या बाबतीत देखील भाजप सरकारने कशी फसवणूक केली ते आता लोकांना कळून चुकलं आहे व सुज्ञ लोक आता भाजपच्या या सोशल मिडियावरच्या खोट्या प्रचाराला बळी पडत नाहीत, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला.

या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले, तसेच यावेळी जयसिंह सोळंके, महेबूब शेख, मा आ. पृथ्वीराज साठे, विजयसिंह पंडित, ऍड डी बी बागल, आ. संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ.प्रकाशदादा सोळंके यांनीही पक्ष संघटनेबद्दल आपले विचार व अपेक्षा व्यक्त केल्या.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button