बीडबीड जिल्हा

अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करा-अमरसिंह पंडित

मंत्री टोपे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे केली मागणी

बीड,  ः- दिव्यांग व्यक्तिंची तपासणी करून त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुरु आहे. मात्र जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून दिव्यांग विशेषतः अंध व्यक्तिंना जिल्ह्याच्या ठिकाणी अपंगाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ये-जा करणे खूपच त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करून उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातून दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा मिळावी अशी मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. या बाबत सत्वर कार्यवाहीचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२२ जुलै रोजी जिल्हा आरोग्य यंत्रणेने संकल्प निरोगी बीड हे अभियान यशस्वीपणे राबविले. या अभियानामध्ये एक दिवसासाठी अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करण्यात आले होते. या संकल्पनेचा धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी दिव्यांगांना आवश्यक प्रमाणपत्र मिळताना होत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. दिव्यांग विशेषतः अंध व्यक्तिंना जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून जिल्हास्तरावर येवून जिल्हा रुग्णालयात नोंदणी करणे, तपासण्या करणे आणि तासंतास रांगेत उभा राहणे अशा कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागते. यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

तालुकास्तरावर उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात अपंगाचे बोर्ड कार्यान्वित करून तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंना तालुकास्तरावर आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यास दिव्यांगांना सहज आणि सुलभ पध्दतीने प्रमाणपत्र मिळू शकेल त्यामुळे ही सुविधा तातडीने सुरु करण्याची मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केली आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेदन दिले. ना.टोपे यांनी आरोग्य संचालकांना या बाबत निर्देश देवून कार्यवाहीचे दिले आहेत. तर सामाजिक न्याय विभागाकडून लवकरच दिव्यांगांचे नवीन धोरण जाहिर होणार असून यामध्ये अपंगाच्या बोर्डाचा समावेश करण्याच्या सूचना संबंधितांना देणार असल्याचे आश्‍वासन ना.धनंजय मुंडे यांनी दिले आहे. दोहो मंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे लवकरच अपंगाचे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित होणार आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button