बीडबीड जिल्हामराठवाडामहाराष्ट्र

दौरे थांबवून आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – अँड. अजित देशमुख

बीड ) प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे बेहाल झालेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. आतापर्यंत अनेक दौरे झालेले आहेत. त्यामुळे आता सर्व दौरे थांबवून शेतकऱ्यांना चार – आठ दिवसात मदत कशी देता येईल ? याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी यांनी यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे करणे गरजेचे असते. मात्र आता भरपूर दौरे झाले आहेत. अनेक दिवस दौऱ्याचे सत्र चालू राहिले, तर शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिल. मर्यादेपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. एका रात्रीत मोठ-मोठी धरणे भरली आहेत. यावरून पावसाचे प्रमाण किती होते, हे स्पष्ट दिसते.

अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या महसूल आणि कृषी या दोन्ही विभागाने तात्काळ पंचनामे करणे आवश्यक होते. मात्र अजूनही पंचनामे काही ठिकाणी झाले नसल्याचे दिसते. त्याच बरोबर विमा कंपनी सध्या काय करत आहे ? हे देखील कळायला मार्ग नाही. नुकसान झाल्यानंतर २४ तासात, ४८ तासात कळवा, तरच नुकसान भरपाई मिळेल. अशी जर विमा कंपनीची असेल तर प्रशासनाने दौरे थांबवून या अटीची पूर्तता विमा कंपनी कडून करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा विमा कंपनी अंग झटकून मोकळी होईल.

पावसाने पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जमिनीतील माती वाहून गेली आहे. जणावरांना चारने देखील अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. मोठा पाऊस होऊन गेला, तरी अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. माजलगाव धरण आणि बिंदुसरा तलाव यासाठी मोठ-मोठी धरणे रात्रीत भरली. त्यामुळे भविष्यातील पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाने सज्ज असायला हवे.

जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी यासाठी ठोस असा पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या आदेशाचे महसूल, कृषी आणि विमा कंपनी या सर्व अधिकाऱ्यांकडून पालन होत आहे का ? हे देखील पाहणे आवश्यक झाले आहे. जेवढा विलंब लागेल, तेवढा शेतकरी पोळला जाईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून येणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात भरघोस अशी मदत शेतकऱ्यांच्या पदरी पाडून द्या. हे करून घेण्यासाठी दौरा थांबवा, असे आवाहन देखील अँड. अजित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button